Wednesday, 29 July 2015

स्वर्गीय अंधारबन
प्रारंभ: पिंपरी (ताम्हिणी)
शेवट:  भिरा

ट्रेक चे अंतर: १४ किलोमीटर
ऐतिहासिक संदर्भ:   अंधारबनातील दरीच्या सुरुवातीला असलेल्या सिनेर खिंडीत नावजी बलकवडे यांचे स्मारक आहे. सन १६९३ मध्ये, राजाराम महाराजांच्या काळात नावजी बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा एकदा कोंढाणा (सिंहगड) जिंकला होता.


अंधारबन


           अंधारबन! नावाप्रमाणेच सूर्याची किरणेही जेथे पोहोचत नाहीत असं घनदाट जंगल, चहूबाजूंनी कोसळणारे आणि पावलो-पावली ओलांडावे लागणारे खळखळते  धबधबे, दूर दूर वर पसरलेले हिरवे-गार डोंगर अशी स्वर्गीय अनुभूती देणारे ठिकाण! अंधारबन ट्रेक ची आणखी एक खासियत म्हणजे या संपूर्ण ट्रेक मध्ये हिरडी गाव सोडलं, तर तुम्हाला कुठेच वस्तीच्या खुणा दिसत नाहीत, चहूबाजूंनी दूर-दूर वर पसरलेले अथांग पर्वत आणि घनदाट जंगलातूनच अंधारबनाची वाट जाते.

           अशा या अंधारबनात जाण्यासाठी पुण्याहून फार दूर जायची गरज नाही. पुण्याहून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील "पिंपरी" गावातून अंधारबन ट्रेक ची सुरुवात होते. साधारण १४ किलोमीटर चा अंधारबनाचा जंगल रस्ता म्हणजे अनेक पशु- पक्षी व कीटकांचे घर आणि निसर्गसंपत्ती व मनमोहक दृश्यांचा खजिनाच! अंधारबनातून जाताना कुंडलिका व्हॅली व प्लस व्हॅली या ताम्हिणी मधील आणखी दोन ट्रेक ची झलक दिसते.





           पुण्यातल्या "वाटसरू ट्रेकर्स" बरोबर आम्ही अंधारबन ट्रेकला जायचा बेत आखला. अंधारबनात जाण्यासाठी पिंपरी व भिरा या दोन्ही गावातील सार्वजनिक बस सुविधा रामभरोसेच असल्याची माहिती मिळाली. तसेच हा ट्रेक पिंपरी गावातून चालू होत असून भिरा गावी संपत असल्यामुळे व ट्रेक पूर्ण करायसाठी ७ ते ८ तासांचा कालावधी लागत असल्यामुळे स्वतःचे वाहन घेऊन जाणेहि तितके सोयीस्कर नाही.
अखेर २६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता आम्ही अंधारबनला जाण्यासाठी निघालो. अडीच तासाचा  प्रवास संपवून आम्ही पिंपरी गावातील पाझर तलावापाशी उतरलो, तेव्हा धुक्यात गुरफटलेले डोंगर आणि ओसंडून वाहणारा पाझर तलाव पुढील भटकंती ची उत्कंठा वाढवत होता. तलाव ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि चालू झालं अंधारबन चं दाट जंगल! हे  जंगल ओलांडताना वाटेत अनेक धबधबे लागत होते. कित्येक फूट उंचीवरून कोसळणारे हे धबधबे, कड्याच्या टोकावरून पार करायचा अनुभव खूपच रोमांचकारी होता! हे सर्व धबधबे ओलांडत आजूबाजूची दृश्य कॅमेऱ्यात टिपत आम्ही पुढे निघालो. दोन सव्वा-दोन तास चालल्यावर जेव्हा आम्ही जंगलातून बाहेर पडलो तेव्हा एक मोठं हिरवंगार पठार लागलं, जणू हिरवळीचा गालिचाच अंथरल्या सारखं! हिरव्या रंगाच्या सुद्धा इतक्या विविध छटा असतात हे जंगलात फिरल्यावरच कळतं. पठारावरून समोर एक नजर टाकली तेव्हा समोर कुंडलिका नदी आणि उंचावरून कोसळत तिच्या पात्रात येउन मिळणारे धबधबे असं विहंगम दृश्य दिसत होतं.


          त्यानंतर साधारणतः तास- दीड तास चालल्यावर पुढे हिरडी नावाचं एक छोटं गाव लागलं. गावातल्याच एका छोट्याश्या शाळेमध्ये थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही दुपारचं जेवण केलं. (अंधारबनात जेवणाची सोय व पाणी उपलब्ध नाही, तेव्हा जाताना आपल्या बरोबर मुबलक पाणी व जेवणाचा डबा घेऊन जावे).यानंतर आम्ही गावातील शंकराचे मंदिर पहावयास गेलो. मंदिराकडे जाण्यासाठी गावातील हिरव्यागार भात-शेतांमधूनच एक वाट जाते. मंदिरासमोरच पुष्करणी देखील आहे. मंदिर पाहून झाल्यानंतर पुन्हा आम्ही अंधारबनाच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. त्यानंतर पुन्हा सुमारे ३ तास जंगलातून वाट काढत डोंगर उतरल्यावर समोर, भिरा गाव व तेथील उन्नैयी धारण दिसू लागले. डोंगराच्या पायथ्याशी आल्यावर आम्हाला समोर एक ओढा लगला. हा ओढा ओलांडण्यासाठी एक छोटासा लाकडी पूल देखील होता, परंतु ओढ्याला फारसा प्रवाह नसल्यामुळे आम्ही ओढ्यातच उतरून पाण्यात मनसोक्त खेळून घेतले.


           ओढा ओलांडून आम्ही निघालो आणि थोड्याच वेळात उन्नैयी धरणाची भिंत लागली. तेथून जे मनमोहक दृश्य दिसलं ते पाहून आम्ही एव्हडा वेळ चालून आलेला थकवा पार विसरून गेलो. हे दृश्य कॅमेऱ्यात टिपून आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. अखेर बसमध्ये येउन बसल्यावर खिडकीतून समोरच्या डोंगराकडे नजर टाकली तेव्हा मनात विचार आला,
" असंख्य डोंगर-दऱ्यांच्या हिरवळीने नटलेला हा सह्याद्री आमच्या सारख्या कित्येक "वाटसरूंना" आपल्या निसर्ग संपत्तीची भेट तर देतोच आहे; पण त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देताना, आपल्या कुशीतील साडे- तीनशे किल्ले जपतो आहे!
गेली साडे-तीनशे वर्ष!"

"वाटसरू"



-नितीश साने

5 comments:

  1. Replies
    1. Khup sundar bhava..mi aaj chalo ahe chan lihal ahes...thank you my you tube channel Vlogy Vishal

      Delete
  2. Good ,फार चढ़ उतार नसतील तर कोणत्याही वयात करणे अवघड नसावे

    ReplyDelete
  3. धबधबे कड्यावरून पार करणे कठीण असते का ? चढ उतार किती आहेत वाटेत ? थोडं सविस्तर कळवू शकाल का?

    ReplyDelete